घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे सर्पदंशाची दुर्दै

यवतमाळमध्ये सर्पदंशाने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; झोपेत कानाला दंश, उपचारादरम्यान आर्यनची प्राणज्योत मालवली

Yavatmal Snake Bite

घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथील घटना; ‘मण्यार’ सापाचा दंश झाल्याचा प्राथमिक अंदाज, गावावर शोककळा

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे सर्पदंशाची दुर्दैवी घटना घडली असून, उपचार सुरू असताना ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. घरात झोपलेल्या अवस्थेत सापाने त्याच्या कानाला दंश केला. मात्र सुरुवातीला हा प्रकार सर्पदंशाचा असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही.

ही घटना पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. आर्यन घरात झोपलेला असताना सापाने त्याच्या कानाला दंश केला. एखादा किडा चावला असावा, असा सुरुवातीचा अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला. त्यानंतर काही वेळातच आर्यनची प्रकृती बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ग्रामीण रुग्णालयात आर्यनवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारांसाठी त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आर्यनला यवतमाळ येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

आर्यनला दंश करणारा साप अतिविषारी ‘मण्यार’ जातीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आर्यन हा माणूसधरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने शाळेतील शिक्षक आणि वर्गमित्रांवर दुःखाचे सावट पसरले आहे. या घटनेने माणूसधरी गावातही हळहळ व्यक्त होत असून, तुम्मावार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.